दिगंबरा… दिगंबराच्या जयघोषात रावेरात रथ परीक्रमेला सुरूवात

0

रावेर : दत्तात्रय महाराज की जय.. दिगंबरा…दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रावेर शहरातून भगवान श्रीकृष्ण यांच्या रथ परीक्रमेला शुक्रवारी दुपारी सुरुवात झाली. सुरूवातीला महिलांना रथ ओढण्याचा मान मिळाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पुष्प आणि रेवड्यांची उधळण करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन रथोत्सवाच्या मार्गक्रमणाला सुरुवात झाली.

रथोत्सवाला 181 वर्षांची परंपरा
रावेर शहरातील श्री दत्त जयंती व रथोत्सवाला सुमारे 181 वर्षाची परंपरा आहे. रथाची श्रीरंग कुलकर्णी यांनी सौभाग्यवती दीपिका कुलकर्णी यांच्या सोबत विधीवत पूजा करून केली तसेच पूजा-हवन करून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सहकारी म्हणून संजय मटकरी, आशिष कुलकर्णी, ऋषिकेश महाराज, विद्यमान गादीपती श्रीपाद कुलकर्णी आदींनी सहकार्य केले. यावेळी रथाला मोगरी लाऊन दिशा देण्याचे काम कैलास कासार, भूषण कासार, निलेश पाटील, मुकेश पाटील, मधुकर कासार, मधुकर कासार, मंगसूर लोहार, संजय लोहार, राहुल महाजन यांनी केले. दरम्यान रथोत्सव यशस्वीतेसाठी उपनगराध्यक्ष असदउल्ला खान, नगरसेवक सादिक मेंबर, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, नितीन पाटील, हरीष गनवाणी, शैलेंद्र अग्रवाल, अरुण शिंदे, डी.डी.वाणी, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, किशोर वाणी, युसूफ खान आदी मिरवणूक यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.

रेवड्या व पुष्प पाकळ्यांची उधळण
श्री दत्त जयंतीनिमित्त प्रसाद म्हणून गुळासह तीळाद्वारे तयार करण्यात येणार्‍या रेवड्यांची रथोत्सव मिरवणुकीवर उधळण करण्याची परंपा आहे. यासाठी महाराष्ट्रभर नोकरीनिमित्त गेलेले रावेरकर शहरात दाखल झाले आहेत तसेच प्रसाद म्हणून अनेक भाविक रेवड्यांची रथावर उधळण करतात.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेरचे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वात आरसीपी प्लाटून कर्मचार्‍यांसह पाच पोलिस अधिकारी , 28 कर्मचारी तसेच रावेर येथील 20 पोलीस कर्मचारी, 49 होमगार्ड यांच्यासह असा एकूण 125 कर्मचार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त राखला.

कृष्णभावनामृत हरी कृष्ण संकीर्तन आकर्षणाचे केंद्र
श्री दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थान असल्याने आजच्या या रथोत्सव निमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकिर्तन आकर्षणाचे केंद्र राहिले. या संकीर्तनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते

आज पालखीचे आयोजन
शनिवार, 14 रोजी सायंकाळी पालखी काढण्यात येणार आहे. ही पालखी आठवडे बाजार येथे आल्यानंतर दहीहंडी फोडल्यानंतर फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येईल. हा क्षण बघण्यासाठी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने रावेरमध्ये दाखल होतात. दरम्यान, भगवान श्रीकृष्ण यांच्या रथाला विविध विधीवत पूजा करून सिध्द केल्यानंतर रथ ओढला जातो. या रथाच्या चाका खालची माती कपाळी लावल्यास मोक्ष मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. रथोत्सवानिमित्त आठवडाभर चालणार्‍या यात्रेत लहान मुलांचे खेळणेे, घर उपयोगी वस्तु, कपडे, दुकाने, आकाश पाळणे, फोटो स्टुडिओ आदी थाटण्यात आले आहेत. यात्रोत्सवाच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होते.