दिगंबरा… दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रावेरमध्ये रथ परीक्रमेला सुरूवात

0

रथोत्सवानिमित्त भक्तीला उधाण ; भाविकांना केला रथावर रेवड्यांची उधळण ; आज सायंकाळी पालखी मिरवणूक निघणार ; यात्रोत्सवात लाखोंची उलाढाल

रावेर- श्री दत्त जयंतीनिमित्त सुमारे 180 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या श्रीकृष्ण-दत्त रथोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिगंबरा… दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रथ परीक्रमेला रविवारी दुपारी चार वाजेपासून सुरूवात झाली. फुलांनी सजवलेल्या रथात भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून रथामध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर रथाचे पूजन श्रीरंग कुलकर्णी व दीपीका कुलकर्णी यांनी केले. रथोत्सव परीक्रमेत भाविकांनी रथावर रेवड्यांची उधळण केली तसेच भाविकांनाही रेवड्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान, शनिवार, 22 रोजी दत्त मंदिरात श्री गुरुदेवदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला तर सोमवार, 24 रोजी श्रींच्या पालखीचे महापूजन व दहीहंडी मिरवणूक निघणार आहे.

यांचा रथोत्सवात सहभाग
रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरूवात झाली. कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले होते. रथाला फुलांनी सजवण्यात आले होते तर रथोत्सवासाठी सहकार्य करणार्‍यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रथावरील डॉ.धनंजय राजगुरू, रवींद्र सराफ, विकास राजगुरू, नितीन राजगुरू, डॉ.रामचंद्र राजगुरू यांनी भाविकांकडून आरती स्वीकारणे व प्रसाद वितरणाचे काम केले. पौरोहित्य संजय मटकरी, आशिष कुलकर्णी यांनी केले. रथाला मोगरी लावण्याचे काम कैलास कासार, भूषण कासार ,कन्हैया कासार, मधुकर कासार ,संदीप कासार ,निलेश पाटील ,दिलीप कासार व विशाल पाटील यांनी केले.

हजारो भाविकांचा रथोत्सवात सहभाग
रथाची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. रथगल्ली, भोईवाडा, गांधी चौक, मेन रोड, नाला भाग, नागझिरी रोड, भाजी मार्केट, पाराचा गणपतीमार्गे लालबहादूर शास्त्री चौकात रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सवासाठी रावेर शहर परीसराह बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक येथे आले होते.

यात्रोत्सवानिमित्त लाखोंची उलाढाल
शहरात गांधी, चौक आठवडे बाजार व दत्त मंदिर परीसरात यात्रोत्सवानिमित्त निमित्त झोके , खेळण्यांची दुकाने , संसारोपयोगी वस्तूंची तसेच खाद्य पदार्थाची दुकाने थाटण्यात आली आहे. विविध वस्तू घेण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ शहरात दाखल झाल्याने लाखो रुपयांची यानिमित्त उलाढाल झाली. विशेषतः रथोत्सवात सर्वाधिक मागणी रेवड्यांना असल्याने रेवडी विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने दुकान थाटली आहेत.

कृष्णभावनांमृत संघातर्फे हरी कृष्ण संकीर्तन
दत्त जयंतीनिमित्त पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकिर्तन सादर करण्यात आले. दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्वाचे धार्मिक स्थान असल्याने नोकरी व कामधंद्यांनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी रथोत्सवानिमित्त आवर्जून शहरात दाखल झाली आहेत.