दिग्गजांचा राष्ट्रवादीला रामराम

0

बारामती (वसंत घुले) । इंदापूर तालुक्यातील राजकारण हे नेहमी बदलत्या स्वरूपाचे असते. सधन तालुका म्हणून त्याची ओळख आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज मंडळी लवकरच पार्टीला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते. येत्या तीनचार महिन्यात इंदापूर तालुका जिल्ह्यातील राजकीय भूकंप ठरण्याची शक्यता आहे. यासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीतील दिडशे महत्त्वाचे पदाधिकारी यात आजीमाजी सरपंच, जिल्हापरिषद सदस्य तसेच महत्त्वाचे कार्यकर्ते भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

भाजपची लाट
इंदापूर तालुक्यात विद्यमान आमदार दत्तत्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आहेत. तर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. गेल्या वर्षभरात हर्षवर्धन पाटील यांनी वाड्यावस्त्यांवर व गावभेटींवर भर दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाल्यास विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तुल्यबळ दावेदार असतील तर ही जागा काँग्रेसकडे सोडली गेल्यास हर्षवर्धन पाटील यांना उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीत काय बदल होतो याची वाट पाहण्यापेक्षा भाजप लाटेत सहभागी व्हावे, असे अनेकांचे म्हणणे आहे. भाजपाने नवखा चेहरा दिल्यास परिवर्तन होईल व त्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

राष्ट्रवादीत वाढली गटबाजी
मागील वर्षभरात राष्ट्रवादीतील दुसर्‍या नंबरच्या फळीतील काही नेते व कार्यकर्ते भाजपावासी झालेलेच आहेत. मात्र सध्या द्वीधा मनस्थितीत असलेले राष्ट्रवादी व काँंग्रेसमधील अनेक दिग्गज हे ही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. या दिग्गजांच्या आपल्या कार्यकर्त्यांसोबत वारंवार बैठका सुरू आहेत. गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादीतील गटबाजी वाढत असल्याचे दिसून येत असून निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे या नाराजीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

राजकीय कार्यक्रमांची रेलचेल
तालुक्यातील जुनेजाणते व अनुभवी नेतृत्व तसे नसल्यातच जमा आहे. नवीन पिढी ही भाजपकडे मोठ्या आशेने बघताना दिसून येत आहे. ही नवीन पिढी नेतृत्त्व करण्यासाठी पुढे सरसावत आहे. जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती प्रविण माने, पंचायत समितीचे सभापती करण घोलप, यांच्याही आशा तालुक्याचे नेतृत्त्व करण्यासाठी पल्लवित झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. सर्व नेते आश्‍वासनाची खैरात करीत आहेत. त्याचमुळे नक्की कोणाचे नेतृत्त्व मान्य करावे या संभ्रमात सर्वसामान्य जनता आहे.

राजकीय स्थिती बदलणार!
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये गेल्यास तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता भाजपातील एका जबाबदार नेत्याने व्यक्त केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा आमदार असावा. तसेच लोकसभेला तालुक्यातून सर्वात जास्त म्हणजे एक नंबरची मते भाजपला मिळावीत, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, असेही या नेत्याने सांगितले.