पणजी : भाजपचे गोव्यातले आघाडी सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यावर काँग्रेसमधील उखाळ्यापाखाळ्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. विश्वजित राणे व साल्व्हो रॉड्रिग्ज या दोन आमदारांनी आधीच आमदारकीसह काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. आता गोवा काँग्रेसचे अध्यक्ष लुईझानो फ़ालेरो यांनीही दिग्विजय यांच्या डोक्यावर खापर फोडलेले आहे. त्यांच्या मते शनिवारी निकाल पूर्ण झाले, तेव्हाच काँग्रेसपाशी 21 आमदार होते. पण राज्यपालांकडे सत्तेचा दावा करायला जाण्यापासून सिंग यांनीच आम्हाला रोखले आणि सर्व काही बिघडत गेले.
काँग्रेसचा प्रभारी म्हणून ईशान्येकडील राज्यात काम करताना आपणही अनेकदा निकालानंतर राज्यपालांकडे आधी दावा केलेला होता. त्यामुळेच गोव्यातही तसाच दावा करण्यासाठी आम्ही राज्यपालांना द्यायचे पत्र लिहून तयार होतो. पण दिग्विजय यांनी आम्हाला रोखले व राज्यपालच संपर्क साधतील, म्हणून कालापव्यय केला. दोन अपक्ष व दोन अन्य आमदार मिळून 21 आमदार काँग्रेसपाशी होते. पण दिग्विजय यांनी दावाच करू दिला नाही, म्हणून सगळा विचका झाला, असा फ़ालेरो यांचा आरोप आहे. मात्र, दिग्विजय सिंग आपल्या आडमुठेपणावर ठाम आहेत. राज्यपालांनीच संपर्क करायला हवा असा त्यांचा हट्ट कायम आहे.
काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे बघून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई त्यात सहभागी व्हायला राजी होते. पण काँग्रेस राज्यपालांकडे जाऊच शकली नाही आणि सर्व खेळ विस्कटत गेला. केवळ दिग्विजय यांच्या हट्टामुळे काँग्रेसने जिंकलेली बाजी गमावली. आता तर गोवा काँग्रेसमध्येच बेबंदशाही माजली आहे. दोन आमदारांनी आधीच राजीनामा दिलेला असून आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.