दिघीत पिस्तूलासह दोघांना अटक

0
पिंपरी : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी खंडणी व दरोडा विरोधी पथकाने दिघी परिसरातून दोघांना अटक केली. या दोघांकडून दोन पिस्टल आणि जिवंत 3 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी दिघी येथील मॅग्झिन चौकात ही कारवाई करण्यात आली. प्रतिक उर्फ पद्या प्रकाश तापकीर (वय-26, रा. म. फुले शाळेजवळ, भोसरी), किरण संजय कटके (वय-23, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी मॅग्झिन चौकात दोन तरुणांकडे पिस्टल असल्याची माहिती खंडणी व दरोडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता प्रतिक याच्याकडून 25 हजार 200 रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. तर किरण याच्याकडून 50 हजार 400 रुपयाचे पिस्टल आणि 2 काडतूस जप्त करण्यात आली. असा एकूण 75 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.