स्वखर्चाने काम करण्याची तयारी
भोसरी : येथील महानगरपालिकेच्या मंजुर आराखड्यातील दिघीला जोडणारा भोसरी ते दिघी हा प्रभाग क्रमांक 5 मधील 15 मीटर डीपी रस्ता ते 18 मीटर डीपी रस्ता जोडण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. येथील नागरीकांची गैरसोय पाहता पावसाळ्याच्या पुर्वीच या रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश गवळी यांनी केली आहे. तसेच महापालिका असमर्थ असेल तर मी माझ्या स्वखर्चाने तो रस्ता तयार करण्यास तयार असल्याचे गवळी यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कळविले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्ष दिघीकरांना ह्क्काच्या रस्त्यासाठी झगडावे लागत आहे. तरी देखील त्यांची ही समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. लोकप्रतिनिधींचे देखील प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. यामुळे या परिसरात वाढणार्या लोकसंखेचा विचार करता या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वीच त्वरीत पुर्ण होणे गरजेचे आहे.
दिघीला भोसरीतुन जोडणारा एकही डीपी रस्ता अदयापही सुरु नाही. यामुळे येथील लाखो नागरीकांना मॅगझीन चौकातील रस्त्याचा वापर नाईलाजने करावा लागत आहे. पण हा रस्ता जेष्ठ नागरीकांना व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा असून, अपघाताला निमंत्रण देणारा आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनीधींनी येथील डीपी रस्ता चालु होईल अशी आश्वासने दिली होती. त्या आश्वासनाची नागरीक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळेच हा 15 मीटर डिपी रोड सामाजीक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मी स्वखर्चाने सर्वांना बरोबर घेऊन करण्यास तयार आहे. असे आशयाचे पत्र योगेश गवळी यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले आहे.