दिड लाखांचा ऐवज लंपास

0

दौंड । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 1 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना राहू भागातील विहीर परिसरात घडली. चोरट्याने रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या परीसरातून अशा प्रकारची चोरी होण्याची ही तीन महिन्यातील तिसरी घटना असल्याने चोरांनी पोलिसांनाच आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.

याप्रकरणी सावित्राबाई दत्तात्रय घोलप (वय 58) यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सावित्राबाई या घराला कुलूप लावून सोमवारी त्यांच्या आजारी मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान त्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यवस्त पडलेले होते व लाकडी कपाटही फोडलेले आढळले. कपाटातील रोख 18 हजार रुपये व सोन्याच्या बांगड्या, चांदीचे पैंजण असा 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.