नवी दिल्ली । निवडणूक आयोगाच्या अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अण्णाद्रमुकचे उपसरचिटणीस टी.टी.व्ही दिनकरन यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दिनकरन यांच्या अडचणी वाढल्या असून, अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्या गटाला यामुळे मोठा हादरा बसला आहे.
अण्णाद्रमुकच्या विद्यमान सरचिटणीस शशिकला यांचे दिनकरन हे पुतणे आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच शशिकला सध्या तुरुंगात आहेत. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा व तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आरके नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने अण्णा द्रमुकचे ‘दोन पाने’ हे चिन्ह जप्त केले होते. हे चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक अधिकार्यांना 50 कोटी रुपयांची लाच देण्याची दर्शवली होती.
दिनकरन यांनी यासाठी सुकेश चंद्रशेखर या दलालाची मदत घेतली होती. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सुकेशला अटक केली. सुकेशकडून 1.3 कोटी रुपये आणि दोन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दिनकरन यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस त्यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिनकरन यांच्यावरील गुन्ह्यामुळे शशिकला यांना मोठा हादरा बसला आहे. पक्षातील काही मंत्री आणि आमदार आता दिनकरन यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेत असून, दिनकरन यांच्या राजीनाम्याची मागणीही पक्षात जोर धरू लागली आहे. त्यामुळे शशिकला गटाला आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची दिन्ह दिसत आहेत.