दिपनगर केंद्रातील युनिट सहाच्या कामाला प्राधान्य द्या

0

भुसावळ। औष्णिक वीज केंद्रात युनिट सहा नवीन प्रकल्प उभारण्याबाबत सर्व कायदेशिर बाबी पूर्ण झाले असतांना प्रकल्प निर्माण करण्याची कुठलीही कारवाई केली जात नाही. राज्यात अद्यापही खाजगी वीज उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात वीज खरेदी केली जात आहे. रखडलेल्या नियोजित युनिट सहा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे.

बेरोजगारांना मिळणार संधी
पुढील 10 वर्षांनंतर राज्यात विजेची मागणी प्रचंड असणार आहे. त्यावेळी सरकारी विजनिर्मितीची गरज भासणार आहे. असे असले तरी वीज कंपनीतील अंतर्गत सुधारणेला सरकार व व्यवस्थापन प्राधान्य देत नसल्याने परत एमओेडीमुळे अनेक वीज केंद्र बंद ठेवावे लागतील व विजेची कमतरता भरुन काढण्यासाठी परत खाजगी कंपनीकडून वीज घ्यावी लागणार आहे. युनिट सहा निर्माण करण्याबाबत शासनाने कोणतीही भूमिका न घेतल्याने हा प्रकल्प रखडला आहे. वीज प्रकल्प निर्माण झाल्यास बेरोजगारांना येथे संधी मिळणार आहे.

आधुनिक प्रकल्पामुळे प्रदुषण होणार कमी
या आधुनिक प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे यात अत्यंत कमी प्रदूषण होईल. त्यातही आजच्या आधुनिक उपाययोजनांमुळे प्रदुषणाचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्प निर्माण करण्याची जबाबदारी असतांना खाजगी कंपनीकडून प्रकल्प निर्माण करण्याचे अंतर्गत षडयंत्र असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. याबाबत जनआंदोलन छेडण्याचा इशारादेखील दिला आहे. तसेच वीज केंद्र निर्माण झाल्यास एमओेडी, पॉवर परचेस अ‍ॅग्रीमेंटमध्येही दुरुस्ती करावी लागणार आहे. तसे न केल्यास सध्याची जी स्थिती आहे ती कायम राहणार आहे. त्यामुळे कामगार संंघटनांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचेदेखील नमूद करण्यात आले. या निवेदनावर अध्यक्ष अरुण दामोदर यांची स्वाक्षरी आहे.