दिपनगर विद्युत केंद्रात स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा

0

भुसावळ। दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात येथील स्थानिक कपिलवस्ती नगरातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासंदर्भात राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दिपनगर परिसरातील मिलिंद नगर व भिमनगर या दोन वस्त्या गेल्या 50 ते 60 वर्षांपासून या परिसरात वास्तव्य करीत होत्या.

परप्रांतीयांपेक्षा स्थानिकांना प्राधान्य द्यावे
दिपनगर औष्णिक केंद्राचा पायासुध्दा येथील रहिवाशांनीच रचला आहे. त्यामुळे दिपनगर प्रशासनाने परप्रांतातून मजूर मागविण्यापेक्षा या परिसरातील स्थानिक रहिवाशांनाच रोजगार मिळण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे करण्यात
आली आहे.

यासंदर्भात दिपनगर प्रशासन, जिल्हा प्रशासन, तहसिल प्रशासन यांच्यासोबत वारंवार बैठका घेण्यात येवून देखील मागण्या पूर्ण केल्या जात नाही. शासन निर्णयानुसार औष्णिक विद्युत केंद्रापासून पाच किलोमिटर परिसरातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, अशी तरतूद असतांनादेखील दिपनगर केंद्राद्वारे या निर्णयाचे उल्लंघन झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार येथील परप्रांतीय कामगार आयात केले जात आहे आणि स्थानिकांना डावलण्यात येेत आहे. त्यामुळे स्थानिकांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर हरिष सुरवाडे, सोमा जमदाडे, समाधान वाघ, सोपान गायकवाड, हिरामण मगरे, विजय खराटे, वनिता सुरवाडे, विनोद गायकवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहे.