मुंबई: उस्मानाबाद शहरात जानेवारीत होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. मात्र त्यांच्या ‘धर्मगुरु’ असण्याच्या मुद्द्यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या निवडीला विरोध करत टीका केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना अध्यक्षाची निवड मागे घेण्यासाठी धमकीवजा फोन येत आहेत. ख्रिश्चन व्यक्तीला मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करू नका अशी दटावणी करण्यात आली आहे. या चिघळलेल्या वातावरणात साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांनी महामंडळाला पाठिंबा दिला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना काल मंगळवारी दिवसभरात शंभरपेक्षा जास्त फोन आले. काही व्यक्तींनी फोन करुन फादर दिब्रिटो यांच्या निवडीचा निषेध नोंदवला. तर काहींनी धमकी देत निवड रद्द करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी धास्तावले आहेत. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि विश्व हिंदू परिषदे विरोध केला आहे. महामंडळाला सर्वाधिक निषेधाचे फोन कल्याण, ठाणे, मुंबई या भागातून आले. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिब्रिटो यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तर हिंदुत्ववादी संघटना विरोध करीत असताना अद्याप सरकारने दखल घेतलेली नाही. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा बहुमान प्रथमच ख्रिश्चन साहित्यिकाला मिळाला आहे. हा सामाजिक समतेचा योग्य संदेश असल्याचे सांगत साहित्यिक आणि पुरोगामी संघटनांनी महामंडळाला पाठिंबा दिला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. दिब्रिटो यांच्या नावाची शिफारस पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली होती. या प्रस्तावाला साहित्य महामंडळाच्या इतर घटक संस्थांनी पाठिंबा दिला होता. साहित्यिक दिब्रिटो ‘धर्मगुरू’ असल्याचा ठपका ठेवत काही हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींनी सोशल मीडियावर पहिल्याच दिवशी टीकेची झोड उठवली होती. दिब्रिटो यांच्या ललित व वैचारिक लेखनाकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या धार्मिक पुस्तकांचा उल्लेख सोशल मीडियावर ठळकपणे करण्यात आला होता. दोन दिवस सोशल मीडियावर सुरू असलेली टीका आता साहित्य महामंडळाच्या अध्यक्षाला धमकीचे फोन करण्यापर्यंत पोहचली आहे.