दिर्घ विश्रांतीनंतर वरुण राजाचे आगमन

0

जळगाव । केरळात 30 मे रोजी मान्सुनचे आगमन झाले होते. मात्र राज्यात मान्सुन दाखल झालेला नव्हता. राज्यात मान्सुनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी कापूस लागवड केली. कापसाचे बियाण्याला अंकुर फुटल्यानंतर मात्र पावसाने दांडी मारली. गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस नव्हता. दरम्यान काही ठिकाणी अधुन मधुन तुरळक पाऊस झाला तो केवळ पिकांना आधार. संपुर्ण जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा कायम होती. अखेर रविवारी जिल्ह्यात जवळपास सर्वत्र वरुण राज्याचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी जोरदार पावसाची संपुर्ण जिल्ह्यालाच प्रतिक्षा आहे. तुर्त शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. भुसावळ, एरंडोल, जामनेर, पाचोरा, चोपडा जळगाव शहर परिसर आदी ठिकाणी हलका तसेच जोरदार पाऊस झाला तर अद्यापही बाकी तालुक्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

जळगाव शहराला धुतले
जिल्ह्यात काही ठिकाणी अधुन मधुन हलक्या स्वरुपाचा पाऊस झालेला होता मात्र जळगाव शहरासह परिसरात दोन आठवड्यापासून पाऊस झालेला नव्हता. शनिवारी गेल्या 20 दिवसानंतर पावसाने जळगाव शहरात हजेरी लावली. रविवारी तर पावसाने शहराला अक्षरशः धुवून काढले. सकाळ पासून निरभ्र असलेल्या वातावरणात अचानक बदल झाल्याने अनपेक्षीत पावसालाल सुरुवात झाल्याने नागरिकांची धावपळ झाली. सुभाष चौक, फुले मार्केट, गोलाणी मार्केट परिसरातील किरकोळ विक्रेत्यांची धावपळ झाली. शहरात मनपातर्फे नालेसफाई झालेली नसल्याने पावसाचे पाणी दुकानासह घरात घुसले होते. काही ठिकाणी अतिक्रमण वाढल्याने गटारी बुजल्या होत्या. गोलाणी मार्केटसमोरील झाड हवा व पावसात वाकल्याने थेट मुख्य रस्त्यापर्यत आले होते.

दुबार पेरणी टळणार
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जवळपास 80 टक्के कापूस बियासण्याची लागवड झाली होती. त्यापैकी जवळपास 32 हजार क्षेत्रावरील कापूस बियाणे पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर होते. जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरवर कापूस बियाण्याची लागवड होण्यार असल्याचा अंदाज कृषी विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते दरम्यान शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.

भुसावळसह परिसरात मुसळधार
शहरातील खडका चौफुली, जाममोहल्ला, मुस्लीम कॉलनी भागात या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून पाऊस असाच सुरु राहिल्यास घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची भिती होती. दोन वर्षापूर्वी या भागात नाल्यांचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच बसस्थानकालगत नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे वसाहतीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे येथील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या भागात देखील पाणी साचले आहे. बाजारपेठ पोलीस स्थानकासमोरील लोखंडी पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.