मुंबई: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र असल्याने भाजपचा टिकाव लागणार नाही असे बोलले जात होते. नेमके तसेच झाले आहे. 6 पैकी भाजपने फक्त धुळे-नंदुरबारच्या एकमेव जागेवर विजय मिळविला, उर्वरित 4 जागांवर महाविकास आघाडी तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, भाजपला लक्ष केले आहे.
पराभव झाला तर तो खुले मनाने मान्य केले पाहिजे, मात्र हा दिलदारपणा दाखविण्याची दानत भाजपची नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे.
एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर तो मान्य करून आत्मचिंतन करावा लागतो मात्र भाजपने ती तयारी दाखवलेली नाही. खुल्या मनाने पराभव मान्य करावा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीनही पक्ष एकत्र आल्याने आमचा पराभव झाला असल्याचे सांगितले आहे.