दिलासादायक: जुलैनंतर प्रथमच कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी घट

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरासह भारतात थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ८० लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. एकूण संख्या बघता चिंताजनक परिस्थिती दिसून येते मात्र कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत चालल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. आज सोमवारी २७ रोजी आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३६ हजार ४६९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. १८ जुलै रोजी ३४ हजार ८८४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज तब्बल चार महिन्यानंतर कमी रुग्णांची नोंद झाली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. दिलासादायक म्हणजे भारतात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ४२९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख १९ हजार ५०२ इतकी झाली आहे.

सध्या देशात सहा लाख २५ हजार ८५७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत देशात ६३ हजार ८४२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ७२ लाख १ हजार ७० इतकी झाली आहे.

भारतातील कोरोना चाचणीची संख्या १० कोटी ४४ लाख २० हजार ८९४ झाली आहे. मागील २४ तासात ९ लाख ५८ हजार ११६ कोरोना चाचण्या करण्यात आले आहे.