दिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये वाढ; अॅक्टीव्ह रेट घटला

0

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ०५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. भारतातील रिकव्हरी रेटमध्ये देखील दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रेट कमी होत आहे. आजच्या स्थितीत देशात ३१.५९ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तब्बल ६६.३१ टक्के रिकव्हरी रेट आजच्या स्थितीत आहे. काल सोमवारी अॅक्टीव्ह रेट ३२.१२ टक्के होता तर रिकव्हरी रेट ६५.७७ टक्के होता. भारतातील मृत्यूदर २.१० टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत तो कमी आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८०३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे ३८ हजार ९३८ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने दोन कोटींचा पल्ला ओलांडला आहे.