दिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात अव्वल

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात अक्षरश कहर माजविला आहे. देशात दररोज ६० हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ६० हजार ९६३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण संख्या २३ लाख २९ हजार ६३९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८३४ मृत्यू झाले आहे. मात्र दिलासादायक म्हणजे देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा जगापेक्षाही जास्त आहे. जगातील रिकव्हरी रेट ६५ टक्के आहे तर भारतातील रिकव्हरी रेट ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतातील रिकव्हरी रेट ७०.४ टक्के आहे, जो इतर देशांपेक्षा अधिक आहे. अद्याप कोरोनावरील लस बाजारात आलेली नाही, मात्र तरीही भारतातील रिकव्हरी रेट हा वाखाणण्याजोगा आहे.

देशभरातील २३ लाख २९ हजार ६३९ करोनाबाधितांच्या संख्येत, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६ लाख ४३ हजार ९४८ असून, १६ लाख ३९ हजार ६०० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, आतापर्यंत ४६ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ११ ऑगस्टपर्यंत २,६०,१५,२९७ नमूने तपासले गेल आहेत. यातील ७ लाख ३३ हजार ४४९ नमूने काल तपासण्यात आले आहे.

करोनावरील लस देण्याची संभाव्य प्रक्रिया व नियमांबाबत चर्चा करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीची बैठक आज (बुधवार) होणार आहे. त्यात कोविड-१९ लस उत्पादन, पुरवठा व्यवस्था व इतर नैतिक बाबींवरही उहापोह करण्यात येईल. लस देण्याच्या वेळी कुणाला अग्रक्रम द्यायचा, लशीचा पुरवठा कसा असेल अशा अनेक बाबींवर ही समिती विचार करणार आहे. राज्ये, लस उत्पादक कंपन्या यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. लसनिर्मितीनंतर ती कुणाला आधी द्यायची, शीतेपटय़ांची व्यवस्था कशी करायची, लस टोचणाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे याचा विचार आधीच करण्याचे समितीने ठरवले आहे.