कोथरूड नवरात्र महोत्सवात फक्त महिलांसाठी ‘तुमच्या साठी काय पण’ लावणी कार्यक्रम
कोथरूड । आपल्याला राजकारणात आणि समाजकारणात अनेक जबाबदार्या मिळतात मात्र मिळालेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करणे ही प्रदीप रावत यांचे वैशिष्ट्य असून शिपिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही ते समर्थपणे पार पाडतील असे गौरवोद्गार खासदार अनिल शिरोळे यांनी काढले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आयोजित कोथरूड नवरात्र उत्सवात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. आ. मेधा कुलकर्णी यांचा मराठी भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोथरूड नवरात्र महोत्सवात फक्त महिलांसाठी ‘तुमच्या साठी काय पण’ लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर टिळक व खा. शिरोळे यांच्या हस्ते प्रदीप रावत तसेच मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
‘महापौर बचत बाजार’ सुरू करणार
यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विशाल भेलके, मंदार बलकवडे व उमेश भेलके उपस्थित होते. प्रदीप रावत आणि मेधा कुलकर्णी यांचा गौरव करतानाच आपण शहर विकासासाठी कार्यरत असून विशेषत: महिलांसाठी आपण लवकरच ‘महापौर बचत बाजार’ सुरू करणार असून याद्वारे उद्योजक महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही मुक्ता टिळक यांनी सांगितले.
संस्कारांमुळे महिलांना सुरक्षित वातावरण
ललिता पंचमीच्या दिवशी मुलींचे पूजन केले जाते, याच बरोबर सर्व महिलांनी आपल्या मुलांना शिक्षित आणि संस्कारित करावे, असेही टिळक म्हणाल्या. आमचा सत्कार करताना जिजाऊ आणि बाल शिवाजीची प्रतिमा देण्यात आली हे औचित्यपूर्ण असून ज्याप्रमाणे जिजामातानी शिवरायांवर संस्कार केले तसेच संस्कार प्रत्येक आईने आपल्या मुलांवर करावेत आणि त्याहीपेक्षा मुलांवर असे संस्कार करावेत की महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होइल अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. रावत यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात तनिष्का दुगड या सातवीत शिकणार्या विद्यार्थिनीचा जर्मनीतील मेटल मॅथ्स कॅल्क्युलेशनच्या जागतिक ज्युनियर चॅम्पिअनशिप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार मानले. मंदार बलकवडे, उमेश भेलके व विशाल भेलके यांनी स्वागत केले.