नवी दिल्ली ।दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पुन्हा एकदा सदोष ईव्हीएमवर संशय व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा झालेला पराभव हा सदोष मतदान यंत्रांमुळेच झाले असून आपचे जवळपास 25 टक्के मतदान कमी पडल्याचा आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला.
‘आप’ची मते वळवली
अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमिवर आज त्यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टीचा पराभव सदोष ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप केला आहे. ’पंजाबमध्ये सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ईव्हीएमशी छेडछाड करून ’आप’ची मतं अकाली दल आणि काँग्रेसकडे वळवली गेली’, असं केजरीवाल म्हणाले. या माध्यमातून आमची 20 ते 25 टक्के मतं काँग्रेस आणि अकाली दलाकडे फिरवण्यात आली असे ते म्हणाले.
आयोगाला पत्र लिहणार
याप्रसंगी अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्यात याव्या अशी मागणी केली नाही. तथापि, ईव्हीएम मशिनला जुळलेल्या व्हीव्हीपॅटची मोजणी करून ईव्हीएमच्या निकालांशी त्याची पडताळणी करावी, अशी आमची मागणी असून यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिणार आहोत असे ते म्हणाले. असे न झाल्यास जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडेल असा दावादेखील त्यांनी याप्रसंगी केला.
अण्णांनी फटकारले
देशभरात सदोष ईव्हीएमबाबत संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. मायावती, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांनी याबाबत जाहीर वक्तव्य करत हा सर्व संशयास्पद प्रकार असल्याचा आरोप केला आहे. या सर्व मान्यवरांनी मतदान यंत्राऐवजी मतपत्रीकेनेच मतदान घेण्याची मागणी पुढे रेटली आहे. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मात्र या नेत्यांना सुनावले आहे. आहे. जग झपाट्याने प्रगती करत आहे आणि आपण मात्र बॅलेट पेपरची चर्चा करून मागे जाण्याचा विचार करत आहोत अशा शब्दात त्यांनी या नेत्यांना फटकारले आहे.