दिल्लीच्या एजंटने विद्यार्थ्यांना गंडवत दुसर्‍याच्या नावावरील तिकीटे खपवली

0

गोवा एक्स्प्रेसमधील प्रकार ; वाणिज्य विभागाच्या सतर्कतेने 73 हजारांचा दंड वसुल

भुसावळ- गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडे दुसर्‍या प्रवाशांच्या नावावरील तिकीटे असल्याची गोपनीय माहिती रेल्वेच्या वाणिज्य विभागाला मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी भुसावळात डाऊन 12779 गोवा एक्स्प्रेस आल्यानंतर वाणिज्य विभागाने धडक तपासणी मोहिम राबवत तब्बल 51 प्रवाशांकडून 73 हजार 150 रुपयांचा दंड वसुल केला. या प्रकारामुळे गाडीला तब्बल 50 मिनिटे विलंब झाला तर प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा होवू नये यासाठी पाच तिकीट तपासणीसांचे पथक खंडव्यापर्यंत पाठवून दंड वसुली करण्यात आली. नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांना स्थानिक एजंटाने दुसर्‍यांच्या नावावरील तिकीट खपवल्याची माहिती पुढे आली आहे.

दौंड येथून निरोप मिळाल्याने वाणिज्य विभागत सतर्क
डाऊन गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडे दुसर्‍याच प्रवाशांच्या नावावरील तिकीट असल्याची माहिती गाडीतील तिकीट तपासणीला कळाली मात्र महिला प्रवासी असल्याने व एकच तपासणीस असल्याने भुसावळातील वाणिज्य विभागाला माहिती कळवण्यात आली तर मनमाड स्थानकावरही मदतीसाठी कळवण्यात आले मात्र कर्मचारी नसल्याने भुसावळातून मदत मागण्यात आली. भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (कोचिंग) श्याम कुलकर्णी, मुख्य तिकीट निरीक्षक एन.पी.पवार, वाय.डी.पाठक, एस.पी.मालपूरे, पी.एम.पाटील, पी.व्ही.ठाकूर, उमेश कालोसे, रफीक कादर, बी. एस. महाजन, विवियन रॉड्रीक्स, विनय सचान, सी.आर.गुप्ता, एस.ए.दहीभाते, ए.एम.खान, जावेद कुरेशी आदींनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर गाडीतील प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करण्यास सुरुवात केली मात्र या प्रकारात तब्बल 50 मिनिटे गाडी खोळंबली.

51 प्रवाशांकडून 73 हजारांचा दंड वसुल
प्रवाशांकडील तिकीट तपासणीदरम्यान बोगी क्रमांक एस- 8 व 9 मधून प्रवासी करणार्‍या तब्बल 51 विद्यार्थ्यांकडे असलेले तिकीट व ओळखीच्या पुराव्यात साम्य नसल्याने त्यांना विनातिकीटाप्रमाणे दंड आकारून तब्बल 73 हजार 150 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दरम्यान, गाडीला उशीर होऊ नये व अन्य प्रवासी विद्यार्थ्यांकडून दंड वसुलीसाठी वाणिज्य विभागाने गोवा एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणीसांच्या पाच जणांचे पथक खंडव्यापर्यंत पाठवले. दरम्यान, नवीदिल्ली येथील चंदन नगरातील पियुष घुटानी नामक एजंटाने हे तिकीट विद्यार्थ्यांना विक्री केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी तपासणी पथकाला दिली तर या प्रकारामुळे नवी दिल्लीसह देशभरात बेकायदेशीर तिकीट विक्री करणार्‍या दलालांचे रॅकेट सक्रिय असल्याची बाब समोर आली आहे.