दिल्लीच्या वन डे संघाची धुरा गंभीरऐवजी ऋषभकडे!

0

नवी दिल्ली : गौतम गंभीरऐवजी दिल्लीच्या वन डे संघाची धुरा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष अतुल वासन यांनी खुद्द गंभीरशी याबाबत चर्चा करून त्याला याबद्दलची माहिती दिल्याचे समजते. भारताचे माजी फिरकीपटू आणि निवड समिती सदस्य निखिल चोपडा म्हणाले की, विजय हजारे स्पर्धा यंदाच्या मोसमातील अखेरची स्पर्धा आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीच्या संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी कोणता खेळाडू योग्य उमेदवार ठरू शकतो याची पडताळणी आम्हाला करता येईल.

गौतमची जागा घेऊ शकतो असा खेळाडू आम्हाला आजवर सापडला नव्हता. विजय हजारे स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला ऋषभच्या नेतृत्त्व गुणांची पारख करता येईल, असेही निखिल चोपडा म्हणाले. गौतम गंभीरच्या उपस्थितीत ऋषभला चांगली मदत मिळू शकेल. अतुलने याबाबत याआधीच गौतमशी चर्चा केली असल्याचेही चोपडा यांनी सांगितले. २१ वर्षीय ऋषभ पंतने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघात पदार्पण केले होते. रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळताना पंतने त्रिशतकी कामगिरी केली होती. मात्र, यष्टिरक्षक व डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने झुंजार आणि आक्रमक त्रिशतक साकारूनही दिल्ली संघाला महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आघाडी घेण्यात अपयश आले होते.