नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसोबत उडत असलेल्या सततच्या खटक्यांमुळे चर्चेत आलेले नवी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गुरुवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनाच्या सूत्रानुसार, जंग यांनी आपला राजीनामा केंद्र सरकारकडे सुपूर्त केला असून, केलेल्या सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच, त्यांनी केजरीवाल सरकारचेही आभार आपल्या राजीनामा पत्रात मानलेले आहेत. जंग यांच्या राजीनाम्याचे कारण मात्र गुलदस्त्यात होते. दरम्यान, जंग आणि अरविंद केजरीवाल यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘जंग’ सुरू होती. जंग हे केंद्राच्या इशार्यावरून काम करत आहेत. त्यांच्यामुळे दिल्लीतील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ बसली आहे, असा आरोप केजरीवाल यांच्याकडून करण्यात येत होता. अधिकार्यांच्या नियुक्त्यांवरूनही वेळोवेळी संघर्ष उफळून आला होता.
सर्वांचे मानले आभार
नजीब जंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले असून, केलेली मदत आणि सहकार्याबद्दल त्यांनी मोदींना धन्यवाद दिलेत. जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी दिल्लीवासीयांचेही आभार मानलेत. दिल्लीमध्ये एक वर्षभर राष्ट्रपती राजवट होती. त्या काळात लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जंग यांनी लोकांचे आभार व्यक्त केले आहेत. या शिवाय, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रशासन व्यवस्था सांभाळण्याकामी केलेले सहकार्य आणि लोकशाही टिकविण्यासाठी दिलेली साथ याबद्दल त्यांनी केजरीवाल यांचेही आभार मानलेत. वारंवार केजरीवाल यांच्याशी खटके उडाल्यानंतरही जंग यांनी जाता जाता केजरीवाल यांच्याबद्दल आभाराचे दोन शब्द उल्लेखित केले आहेत. जंग यांची केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीच्या नायब राज्यपालपदी जुलै 2013मध्ये 20 वे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दीड वर्षाचा कार्यकाळ उरला असताना त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने विविध तर्क लावण्यात येत होते.