या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली । दिल्लीतील बुराडी परिसरात एकाच घरात रविवारी सकाळी तब्बल ११ मृतदेह सापडले. या प्रकरणी कोणताही अँगल नाकारत नसून सर्व दिशांनी तपास करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यात एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार घराच्या तपासात कागदावर हाताने काहीतरी लिहिलेल्या मजकुराच्या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यावरील मजकूर काळ्या जादूशी किंवा तंत्र मंत्राशी संबंधित असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
बुराडी परिसरात ज्या ११ जणांचे मृतदेह सापडले त्यापैकी १० मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. तसेच ते सगळेच फासावर लटकले होते. तसेच त्यांच्या तोंडालाही कापड बांधलेले होते. मृत्यूच्या या पद्धतीचा आणि चिठ्ठयांवर असलेल्या मजकुराचाही संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस आता या नजरेने ही प्रकरणाचा तपास करत आहेत.
हा जर सामूहिक आत्महत्येचा प्रकार असेल तर आत्महत्येच्या वेळी घराचे दार उघडे कसे असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण शेजार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबियांनी त्यांचा किराणा दुकान शनिवारी रात्री पावणे बारा वाजता बंद केले होते. रविवारी सकाळी एकजण घ्यायला दुकानावर गेला तेव्हा दुकान बंद होते. दुकान घराच्याच इमारतीमध्ये असल्याने त्याने वर जाऊन हाक मारण्याचा विचार केला. पण पायर्या चढून वर पोहोचला तेव्हा धक्काच बसला. घराचे दार उघडे होते आणि त्यामध्ये 11 जणांचे मृतदेह त्याला दिसून आले.
घरात सापडलेले सर्व ११ मृतदेह एकाच कुटुंबाचे आहेत. त्यामध्ये एक वृद्ध महिला, दोन मुले आणि सुना, 5 नातवंडे इत्यादी आणि त्या महिलेच्या मुलीचा समावेश आहे. या महिलेचा तिसरा मुलगा राजस्थानच्या चित्तौरगड येथे कंत्राटदार आहे.