पुणे : पुणे महापालिका निवडणूक निकालाचा अंदाज अचूक वर्तविणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार पराभव होईल, असा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज सपशेल खोटा ठरल्याने ते तोंडघशी पडले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले असून, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांची खरडपट्टी काढल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यांची अशी खरडपट्टी निघणार असल्याचे सूतोवाच दैनिक ‘जनशक्ति’ने यापूर्वीच केले होते. गुजरातमध्ये भाजपला 92 पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज काकडे यांनी वर्तविला होता. प्रत्यक्षात भाजपला 99 जागा मिळाल्याने आता काकडे यांना पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या भविष्यवाणीमुळे काकडेंना दिल्लीतून मोदींनी चांगलाच डोस दिल्यामुळे काकडेंची भाषा सध्या बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्यापेक्षा श्रेष्ठ असून, भाजप मला आईसमान, मोदी पित्यासमान तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लहान भावाप्रमाणे आहेत, असे काकडे यांनी म्हटले आहे.
मोदींच्या करिष्म्यामुळेच सत्ता
खासदार संजय काकडे यांनी गुजरातचा निकाल लागताच मोदींची नेहरू व इंदिरा गांधींशी तोंडी तुलना केली होती. मात्र, त्यावर पक्षाचे समाधान झालेले नसावे असे दिसून येत आहे. कारण यासंदर्भात आता काकडे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, गुजरातमध्ये 22 वर्षे सत्तेत असलेल्या सरकारविरोधी वातावरण होते. त्यामुळे भाजप सत्तेत येण्याची शक्यता नाही असे जरी मी म्हटले होते तरी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच सत्ता येऊ शकते असे मी भाकीत केले होते. मी जे म्हणालो होतो तेच आता सिद्ध झाले आहे. मी जे बोललो होतो ते पक्षाच्या विरोधात बोललो नव्हतो. कारण मी ज्या सर्वेक्षणाच्या आधारे भाकीत केले होते ते सर्वेक्षण सहाजणांच्या टीमने गुजरातमध्ये केले होते.
फटका बसलेला दिसत आहे
काकडे यांनी नमूद केले, की 70 टक्के सर्वेक्षण खेड्यांमध्ये केले होते. या सर्वेक्षणात आमच्या टीमने शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षावाले, वेटर, बसचालक, हॉटेल चालक व छोटे व्यावसाय करणार्या लोकांशी बोलून चर्चा केली होती. यात भाजपविरोधी कल मिळून आला होता. त्यानुसार ग्रामीण भागात भाजपला निकालात फटका बसलेला दिसत आहे. ते मी बोललो होतो. मात्र, लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सकारात्मक होते त्यामुळेच मी भाजप जिंकला तर केवळ मोदींच्या करिष्म्यामुळेच जिंकेल असे म्हणालो होतो. माझे सर्वेक्षण खोटे ठरावे व भाजप सत्तेत यावा तसे झाल्यास मला आनंदच होईल, असे वक्तव्य केले होते, याकडेही काकडेंनी निवेदनात लक्ष वेधले आहे.
खासदार काकडेंचा यू-टर्न
भारतीय जनता पक्ष आपल्याला आईसमान तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पित्यासमान आहेत. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला छोट्या भावाप्रमाणे आहेत. नरेंद्र मोदी हे नेहरू-गांधी घराण्यापेक्षा श्रेष्ठ नेते आहेत अशी स्तुतिसुमने काकडे यांनी उधळली आहेत. गुजरातचा निकाल काठावर का होईना भाजपच्या बाजूने आल्यानंतर दिल्लीतील श्रेष्ठींनी खासदार संजय काकडे यांची फोनवरून खरडपट्टी काढली होती. संजय काकडे हे थेट भाजपचे खासदार नसल्याने त्यांना पक्षातंर्गत नोटीस देता येत नाही. त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी काकडेंना फटकारताच त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून निवेदन देत यू-टर्न घेतला आहे. निवडणूक निकाल अंदाजावरून पुणे शहरातही काकडेंविरोधात पक्षांतर्गत फलकबाजी झाली आहे.