नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्ष एकत्र येत आहे. यात दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीकरता एकत्र येणार अशी चर्चा होती. यापूर्वी देखील दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस – आप एकत्र आले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा आप – काँग्रेस एकत्र येण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित होता. पण, यावेळी देखील काँग्रेसने ‘आप’सोबत जाण्यास नकार दिला.
रविवारी त्याबबत निर्णय होणार होता. पण, एक दिवस उशीर झाल्यानंतर देखील दिल्लीत आप – काँग्रेस एकत्र आले नाहीत. दिल्लीसह हरियाणा आणि पंजाबमध्ये एकत्र लढण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये विचार सुरू होता. यापूर्वी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘आप’कडे मैत्रिचा हात पुढे केला होता. पण, काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी मात्र त्याला नकार दिला होता. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा असून तीन जागांवर काँग्रेस, तीन जागांवर आणि एका जागेवर काँग्रेस आणि ‘आप’चा संयुक्त उमेदवार असा प्रस्ताव होता. ‘आप’नं यापूर्वीच सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान, भाजप अर्थात नरेंद्र मोदींविरोधात समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. देशात महाआघाडीचा प्रयोग देखील केला जात आहे. पण, आता दिल्लीत काँग्रेस आणि आप एकत्र येण्याची आशा आता संपली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्रबाबु नायडू यांनी देखील एकत्र येत भाजपला आव्हान दिलं आहे. तर, राज्यात देखील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. त्यामुळे भाजपविरोधकांची एकी किती यशस्वी होणार हे निकालाअंती स्पष्ट होईल.