दिल्लीत आम आदमी पक्षाचा किल्ला ढासळू लागला

0

दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मतदानाचा प्रभाव आता दिल्लीतही जाणवू लागल्याने आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरिवाल यांचे धाबे दणाणलेले आहे. कारण दिल्ली राज्याची व्याप्ती तीन महापालिकांपुरती असून, त्यासाठी चार आठवड्यांनी मतदान व्हायचे आहे. पंजाब व गोव्यात मार खाऊन आलेल्या केजरीवाल यांना दिल्लीतल्या महापालिका जिंकल्या नाहीत, तर राजकारणात स्थान शिल्लक उरणार नाही. म्हणूनच ते कामाला लागले असून, त्यांनी पुन्हा पक्षाची संघटना व दिल्लीकरांच्या चिंतेचे विषय हाती घेतले आहेत. पण त्यांच्या धरसोडवृत्तीला कंटाळून वेदप्रकाश या आमदाराने पदासह पक्षाचाच राजीनामा दिला आहे.

वेदप्रकाश हे दोन वर्षांपूर्वी झालेल्या मध्यावधी विधानसभा निवडणुकीत पन्नास हजारपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. पण गेल्या दोन वर्षांत आपल्या मतदारसंघात वा एकूणच दिल्लीत केजरीवाल सरकार काहीही करू शकले नाही, असा त्यांचा दावा आहे. मतदार सतत आपल्याला जाब विचारतात आणि आपल्यापाशी कुठलेही उत्तर नसल्याने आपण आमदारकी सोडत असल्याचेही वेदप्रकाश यांनी सांगितले. आपल्यासारखे आणखी 30-35 आमदार पक्षाच्या व नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळले असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

केजरीवाल व अन्य पक्षनेते नुसत्या घोषणा करतात. पण त्यांना दिल्लीपेक्षा अन्य राज्यातले राजकारण खेळायचे आहे. मात्र, अशा नाकर्त्या नेत्यांमुळे व मंत्र्यांमुळे सामान्य जनतेला आमदार सामोरे जाऊ शकत नाहीत. दिल्लीची कुठलीही समस्या केजरीवाल सरकार निकालात काढू शकलेले नाही. इतके मोठे बहुमत असूनही फक्त केंद्र व राज्यपाल यांच्याशीच भांडण करण्यात दोन वर्षे वाया गेली. केजरीवाल यांचा स्वभाव स्थिर नसून चंचलवृत्तीमुळे ते कुठलेही धोरण वा निर्णय फारकाळ राबवू शकत नाहीत, असा आरोप करीत वेदप्रकाश यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून लवकरच आणखी 10-15 आमदार केजरीवाल यांना सोडून जातील असाही त्यांचा दावा आहे.