दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय; अॅलर्ट जारी

0

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ ते ६ दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांचा शहर परिसरात वावर असल्याची माहिती आहे.

दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे सदस्य आहेत. त्यांच्याजवळ स्फोटके असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयएसबीटी, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन आणि इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ या गर्दीच्या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर दिल्लीतील मॉल्स, मल्टीप्लेक्स आणि मंदिरांसारख्या सार्वजनिक ठिकाणांच्याही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्यावतीने १५ जिल्ह्यांचे डीसीपी आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत आपापल्या परिसरात रात्रीच्या वेळेत अधिकाधिक गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून लोकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.