दिल्लीत दहशतवादी लपले; देशभर हायअ‍ॅलर्ट!

0

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला असून, तो अंमलात आणण्यासाठी तीन दहशतवादी जामा मशिदीजवळ लपल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कॉल इंटरसेप्टवर दहशतवाद्यांच्या संभाषणावरून ही माहिती समोर आली. यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला शुक्रवारी अटक केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.

दहशतवादी संघटनांनी रचला कट
‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, जामा मशीद परिसरात तीन संशयित लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे संशयित दहशतवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत असून, ते अफगाणिस्तानचे असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला कोणतीही वाईट घटना घडू नये यादृष्टीने हा हायअ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही या घटनेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून आसियान देशांचे दहा विशेष अतिथी येणार आहेत. यामुळे त्यांच्यासमोर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा डाव लष्कर-ए-तोयबा व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांनी आखला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

तीन दहशतवादी जामा मशीदजवळ लपले
वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, कॉल इंटरसेप्टवरून काही दहशतवाद्यांच्या संभाषणातून या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. हे संभाषण पश्तुन भाषेतील आहे. 26 जानेवारीला दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्याची कामगिरी तीन अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आली असून, सध्या हे तिघे जामा मशिदीजवळ लपल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिल्याचेही या संभाषणातून समोर आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या संभाषणाची एक ध्वनिफीत दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे क्षेपणास्त्रे यांच्याबरोबर संचलन करतात. राष्ट्रपतींना तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना दिली जाते. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यामुळे दिल्लीत कोणतीही अघटीत घटना घडू नये या दृष्टीने हायअ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.