नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. ऑक्टोबरपासून काहीशी संख्या कमी होत आहे. मात्र दिल्लीत पहिल्यापासूनही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या १० दिवसात दिल्लीत ६० हजार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. सरकारकडून कडक लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे, त्यास मंजुरी मिळाल्यास कडक लॉकडाऊन होऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.
दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे. एका दिवसात तब्बल १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ७,४८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिल्लीत आतापर्यंतच्या रुग्णसंख्येने ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: जीटीबी रुग्णालयला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. जीटीबी रुग्णालयात २३२ आयसीयू बेड्स वाढविण्यास मंजुरी देण्यात आल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय दिल्लीतील धर्मशाळांमध्ये ६६३ आयसीयू बेड्स वाढविण्यात येणार आहेत. बाजार पेठा बंद करण्याबद्दल बोलत असताना केजरीवाल यांनी गरज भासल्यास काही बाजारपेठा बंद ठेवाव्या लागतील असं स्पष्ट केलं आहे.