रोख‘ठोक’ भाष्य
जळगाव । (डॉ. युवराज परदेशी) । ज्या लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला तोच जळगाव लोकसभा मतदारसंघ आज भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी गत भाजपाची झाली आहे. निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासून मतदारसंघात रंगणारे राजकीय कुरघोड्यांचे डाव व यात प्रतिस्पर्धी – विरोधकांपेक्षा स्वकियांच्या कटकारस्थानांमुळे पक्षाला आणि नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. विजयाची हॅक्ट्रीक करण्यासाठी विद्यमान खासदार ए. टी. पाटील उत्सुक असतांना सोशल मीडियामध्ये कथित छायाचित्र व्हायरल झाल्याने त्यांचे तिकीट कापून विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. या षड्यंत्रामागे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा जाहीर आरोप करीत खा. पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावला. कार्यकर्ता मेळावे, संपर्क अभियान राबवत त्यांनी उमेदवार बदलाची मागणी लावून धरत पक्षावर दबावतंत्राचा वापर केला. याचवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले मात्र, भाजपाला पाठिंबा देणारे आमदार शिरीष चौधरी यांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्याची भूमिका जाहीर केली.