कोलकाता : काल आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध दिल्ली संघात सामना रंगला. शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरील विजयाचा दुष्काळ ७ वर्षानंतर संपवला. विजयासाठीचे 179 धावांचे लक्ष्य दिल्लीने 7 विकेट राखून पार केले. धवनने 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या. आयपीएलमधील पहिल्या शतकापासून त्याला वंचित रहावे लागले.
सहाव्या स्थानावरून थेट सलामीला खेळायला मिळालेल्या संधीचे सोने करताना शुबमन गिलने (65) शुक्रवारी अर्धशतकी खेळी केली. कोलकाता नाइट रायडर्सच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी आंद्रे रसेलने पुन्हा आपला इंगा दाखवला. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससमोर त्यांना विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवता आले. शुबमनने आयपीएलमधले दुसरे अर्धशतक झळकावले. रसेलने 21 चेंडूंत 45 धावा केल्या.