नवी दिल्ली: दिल्लीतील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांना जीव गमवावे लागले होते. अनेक जण जखमी झाले होते. घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दिल्ली सरकार तसेच केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर केली. अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शरद पवार यांच्या उपस्थितीत 10 लाख रूपयांची मदत देण्यात आली.
शरद पवार यांनी व्यक्तीशः 5 लाख रुपयांचा धनादेश नातेवाईकांना दिला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच, त्यांच्या शिक्षणाचा खर्चही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.जे. ज्योसमान हेही पवारांसमवेत हजर होते. दरम्यान, केंद्र सरकारनेही पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.