दिल्ली डायनामॉझसमोर नॉर्थइस्ट युनायटेडचे आव्हान

0

नवी दिल्ली । नेहरू स्टेडियमवर हिरो इंडियन सुपर लीगमधील शनिवारी होणार्‍या सामन्यात दिल्ली डायनामॉझसमोर नॉर्थईस्ट युनायटेड संघाचे आव्हान असणार आहे. नॉर्थईस्टला अद्याप विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे अवे सामन्यात विजयाची बोहनी करणारा दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर विजयाचे खाते खोलण्यासाठी आतुर असेल. मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांचा संघ पहिले दोन सामने बाहेरील मैदानावर खेळला. त्यामुळे स्पेनचे हे प्रशिक्षक स्थानिक प्रेक्षकांसमोर आपल्या खेळाडूंना खेळताना पाहण्यास आतूर झाले आहेत. पोर्तुगाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मला आमचे मैदान ठाऊक आहे. आम्हाला मिळणारा पाठिंबा मुख्य फरक असेल, कारण संपूर्ण सामन्यादरम्यान प्रोत्साहन देणारे चाहते असणे चांगले ठरते. अर्थात फायद्याची हीच एक बाजू असेल, कारण आम्हाला पहिल्या दोन सामन्यांतील खेळ कायम ठेवावा लागेल. पोर्तुगाल यांनी बचाव फळीतील उणिवांबद्दल चिंता व्यक्त केली. दिल्लीविरुद्ध दोन सामन्यांत सहा गोल झाले आहेत. त्यांनी सांगितले की, केवळ बचाव फळी हीच समस्या नसून एकूणच संघ म्हणून आम्ही ज्या पद्धतीने बचाव करत आहोत ते मला आवडलेले नाही. प्रतिस्पर्ध्यावर भरपूर दडपण आणणे ही आमची शैली आहे.