दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चेन्नईवर ३४ धावांनी मात

0

नवी दिल्ली :- युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या कुशल नेतृत्वात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जला ३४ धावांनी धूळ चारली. या विजयामुळे गुणतालिकेतील समीकरणांवर फारसा काही फरक पडले नाही, परंतु दिल्लीने त्यांचा आत्मसन्मान राखला आहे. दिल्लीने १६३ धावांचे आव्हान चेन्नईला दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला अवघ्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १२८ धावापर्यंत मजल मारता आली.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ अवघ्या १७ धावांवर दीपक चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यर (१९ धावा) आणि ऋषभ पंत (३८ धावा) या दिल्लीच्या मुख्य आधारस्तंभानी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. मात्र लुंगी एन्गिडीने एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवून दिल्लीचे कंबरडे मोडले. मग ग्लेन मॅक्सवेल (५ धावा) आणि अभिषेक शर्माही (२ धावा) लगेच बाद झाल्याने दिल्ली संघ अडचणीत सापडला. ९७ धावांवर निम्मा संघ माघारी परतला असताना अष्टपैलू विजय शंकर आणि हर्षल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दिल्लीला २० षटकांत १६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघातील अंबाती रायडू (५०), धोनी (१७) आणि रवींद्र जडेजाने (नाबाद २७) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली.

धावसंख्या
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १६२ (ऋषभ पंत ३८, हर्षल पटेल ३६; लुंगी एन्गिडी २/१४) वि. वि.
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १२८ धावा (अंबाती रायुडू ५०, महेंद्रसिंग धोनी १७; अमित मिश्रा २/२०, हर्षल पटेल १/२३).