नवी दिल्ली: दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी मध्यरात्री घातपाती कट उधळून लावला. रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी आयएसआयच्या अतिरेक्याला अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी अतिरेक्याला अटक केली आहे. अतिरेक्याकडून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक अतिरेकी फरार झाला आहे. अबू युसूफ असे या अतिरक्याचे नाव असून, आयएसआय या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितले.
National Security Guard (NSG) and Bomb Disposal Squad (BDS) will analyse the contents of the Improvised Explosive Devices (IEDs) recovered today from the ISIS operative: Delhi Police pic.twitter.com/qw3AporSDY
— ANI (@ANI) August 22, 2020
“धोला कुवा येथून एका आयएसआयच्या अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि अतिरेक्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर ही त्याला अटक करण्यात आले. त्याच्याजवळ आयईडी बॉम्बसह शस्त्रसाठा आढळून आला असून, जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह यांनी याविषयी माहिती दिली.
अबू युसूफ हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवाशी असून, दिल्लीत काही साथीदारांसोबत काम करतो. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर त्याच्या परिसरातही पोलिसांकडून छापे टाकण्यात येत आहेत. अतिरेक्याला अटक करण्यात आल्यानंतर लोधी कॉलनी येथील विशेष पथकाच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे.