दिल्ली युनिव्हर्सिटीच्या वादात वीरेंद्र सेहवागची उडी

0

नवी दिल्ली: दिल्ली युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या हिंसेनंतर त्या घटनेबबात सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेवर गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर कॅंपेन सुरू केले आहे. एक फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केला. या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर ”माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं” असे लिहीलेले आहे. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते.

माझ्या बॅटने त्रिशतक झळकावले
त्यानंतर 22 फेब्रुवारीला तिने आपला फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला. त्यावर #StudentsAgainstABVP हॅशटॅग वापरून ”मी दिल्ली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेते आणि मी अभाविपला घाबरत नाही. मी एकटी नाही आहे, भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे” असे लिहिले होते. हा फोटो सोशल मिडीयावर लगेच व्हायरल झाला आणि अनेक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी अशाच आशयाचा फोटो फेसबुकवर लावायला सुरूवात केली. त्यावर म्हैसूर येथील भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा उडी घेतली. एका बाजुला गुरमेहर आणि दुस-या बाजुला दाऊद इब्राहिमचा एक फोटो ट्विट केला. त्यावर ”देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदने किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला” असे म्हटले. तसेच दाऊदच्या हातात असलेल्या पोस्टरवर ”1993 च्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना मी नाही मारलं तर बॉम्बमुळे ते मेले” असं लिहीलं. आपल्या हटके ट्विटमुळे नेहमी चर्चेत असलेल्या सेहवागने एक ट्विट करून या वादात उडी घेतली आहे. ”मी दोन वेळेस त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटने त्रिशतक झळकावलं” असं खिल्ली उडवणारे ट्विट सेहवागने केले आहे. दुसरीकडे या प्रकरणावर गुरमेहरची तुलना दाऊदसोबत केल्यामुळे सिम्हा वादात सापडण्याची चिन्ह आहेत.