दिल्ली येथे जैन इरिगेशनचा अपेडातर्फे गोल्डन ट्रॉफीने गौरव

0

जळगाव। येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स्च्या फळप्रक्रिया विभागास 2014-15 आणि 2015-16 या आर्थिक वर्षात गुणवत्ता व निर्यातीमध्ये सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल अपेडा’तर्फे गोल्डन ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय वाणिज्य सचिव रिता तिओतीया यांच्याहस्ते जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन व व्हाईस प्रेसिडेंट, (सेल्स अ‍ॅण्ड मार्केटींग) रोशन शाह यांनी हा सन्मान स्वीकारला. 12 जून रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

अपेडा संस्थेतर्फे दरवर्षी प्रोत्साहनपर पुरस्कार
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणार्‍या अ‍ॅग्रिकल्चरल अ‍ॅण्ड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ म्हणजेच अपेडा’ या संस्थेतर्फे भारतभरातील कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील जास्तीत जास्त निर्यात आणि चांगल्या गुणवत्तेबद्दल विशेष कामगिरी करणार्‍या फळ प्रक्रिया आणि अन्य प्रक्रिया उद्योगांना दरवर्षी प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिल्ली येथे पार पडली त्यात हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या रुपाने जैन इरिगेशन लिमिटेडचा सलग 15 वेळा अपेडातर्फे गौरव झाला. शेतकर्‍यांच्या नाशवंत शेतमालाला प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धनासाठी कंपनीने अद्ययावत असे अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरु केले.

कांद्यावर प्रक्रिया करणारा सर्वात मोठा प्रकल्प
फ जैन इरिगेशनच्या फळ प्रक्रिया उद्योगात प्रचंड वाढ झाल्याने व्यवसायाच्या विस्तारलेल्या संधी लक्षात घेऊन जैन फार्म फ्रेश फूडस् लिमिटेड या उपकंपनीची स्थापना या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे. आंब्यावर प्रक्रिया करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा प्रकल्प म्हणून जैन इरिगेशनचा फळप्रक्रिया प्रकल्प गणला जातो. या उद्योगात आंबा, पेरु, केळी, आवळा, पपई, डाळिंब, टोमॅटो आदी फळांवर प्रक्रिया करण्यात येते. भारतामध्ये जैन इरिगेशनचा अन्न प्रक्रिया विभाग सर्वात मोठा प्रक्रिया उद्योग म्हणून नावारुपाला आला आहे. कांद्यावर प्रक्रिया करणारा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून कांदा व भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प ओळखला जातो.