नवी दिल्ली : दिल्लीत 2005 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी तारीक अहमद दार याला पतियाळा हाऊस न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली असून, या खटल्यातून मोहम्मद रफिक शहा आणि मोहम्मद हुसेन फजिली या दोघांना आरोपमुक्त करण्यात आले आहे. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 60 जणांचा बळी गेला होता तर 100 जण जखमी झाले होते.
दिवाळीच्या तोंडावर झाले होते बॉम्बस्फोट
दिल्ली साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 2008 मध्ये तारीक दार, मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद रफिक या तिघांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. दार याच्यावर हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप होता तर अन्य दोघांवर गुन्हेगारी कट रचणे, युद्ध पुकारणे, शस्त्रास्त्र कायद्याचा भंग, खून आणि खूनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले होते. दार हा ‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असल्याचे ठोस पुरावेही दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना दिले होते. या खटल्याचा अखेर गुरुवारी निकाल लागला असून, दार याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे तर अन्य दोन आरोपी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सरोजिनी नगर, कालकाजी आणि पहाडगंज अशा तीन ठिकाणी दिवाळीच्या तोंडावर 29 ऑक्टोबर 2005 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. याप्रकरणी विविध तीन पोलिस ठाण्यांमध्ये सर्वप्रथम गुन्हे दाखल करण्यात आले होते.