दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी !

0

मुंबई : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमाव बांधी लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत नऊ मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करता येणार नाही. समारंभ किंवा काही कार्यक्रमांना यामधून सूट देण्यात आली आहे. तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि शासकीय कार्यालयांनाही यातून वगळण्यात आलंय.

सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या वादातून दिल्लीत हिंसाचाराला सुरुवात झाली. सलग तीन दिवस हा हिंसाचार सुरुच होता. आता दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ४२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल शुक्रवारी राजधानीत तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.

सीएए विरोधावरुन दिल्लीप्रमाणे मुंबईतही आंदोलने सुरू आहेत. शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील भिवंडीतही महिलांचे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे सीएए समर्थानासाठीही लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. परिणामी इथंही दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत नऊ मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.