नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी दिल्लीत सीएए आणि एनआरसी आंदोलनावरून हिंसाचार उफाळला. यात १८ जणांचा जीव गेला आहे. अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असतानाही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या दौऱ्यात व्यस्त होते. अखेर आज मोदींनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. “शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे’ असे मोदींनी सांगितले. दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मोदींनी सांगितले.
आज कॉंग्रेसची बैठक झाली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांशी बोलतांना दिल्ली हिंसाचाराला केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याची टीका केली आहे.