दिल्ली हिंसाचार: याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

0

नवी दिल्ली: दिल्लीत सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळला आहे. दोन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचाराची धग कायम आहे. दरम्यान माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसात झालेल्या हिंसाचाराबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दाखविली आहे. आज सुनावणी होणार आहे.

दिल्ली हिंसाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील प्राथमिक सुनावणी न्या. एस. के. कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्यापुढे झाली. त्यांनी आज बुधवारी त्यावर पूर्ण सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार असलेल्यांना अटक करावी या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरही बुधवारी सुनावणी होणार आहे. मानवी हक्क कार्यकर्ते हर्ष मंदर व फराह नक्वी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत शाहीन बाग व इतर ठिकाणी आंदोलने करण्यात आली त्यात सहभागी महिलांच्या संरक्षणाचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात यावेत असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.