पुणे : काही शहरांचा पैसे थकविण्यात नावलैकिक आहे. दिल्लीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी पाठविलेल्या शेती मालाचे पैसे थकविले जातात. त्यामुळे देशाच्या राजधानीचाही यात समावेश आहे की काय? अशी शंका येत आहे. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून याबाबत अधिक कडक कायदे करावे लागतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८ व्या वार्षिक मेळाव्या उद्घाटन समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर, कैलास भोसले आदी उपस्थित होते.
काही शहरांचा शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात नावलौकिक आहे. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे शेतीमालाचे पैसे दिल्लीतील बाजारपेठेतून मिळालेले नाहीत. मी दिल्लीत असताना अनेक शेतकरी याबाबत तक्रारी घेवून येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले पाहिजेत.याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असून या संदर्भात अधिक कडक कायदे तयार करावे लागतील.
राज्यातील द्राक्षाचे क्षेत्र वाढत चालेले तशा समस्याही वाढत आहेत.शेतक-यांच्या अडचणी शास्त्रज्ञांना समजल्या पाहिजेत.तसेच शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचले पाहिजे.त्यातून द्राक्षाची गुणवत्ता वाढेल व उत्पादनातही वाढ होईल,असे स्पष्ट करून पवार म्हणाले,द्राक्षाच्या निर्यातीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाबरोबर बैठक घेवून त्यावर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी येत असली तर त्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.
द्राक्षाचा विचार करता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अजूनही भारताचा वाटा ६ ते ७ टक्क्यांच्या आत आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता असून दजेर्दार वाण वाढवून भारताने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वत:चा विश्वास निर्माण करायला हवा.त्याचप्रमाणे ऊसाला पर्यायी पिक घेण्याबाबत विचार सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात याबाबत इटली,फान्स,जर्मनी आदी देशांना मी स्वत:भेट देणार आहे. सोपान कांचन म्हणाले, केंद्र शासनाच्या संस्थांचा महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महाराष्ट्रा ऐवजी दुसऱ्या राज्यांना निधी दिला जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत. दरम्यान कार्यक्रमात द्राक्षवृत्त या अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते केले. सुभाष आर्वे यांनी प्रास्ताविक तर कैलास भोसले यांनी आभार मानले.