जळगाव । भाजपाचे जेष्ठ नेते कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थीचे चांगदेव येथील तापी पुर्णा नदीच्या संगमावर त्यांचे पुत्र आ. आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. यापूर्वी आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील खडसे फार्म येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे भाऊसाहेब फुंडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला तेथे सर्व कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. भाऊसाहेब यांच्या रूपाने एक सच्चा मित्र, सच्चा स्नेही आणि चांगला मार्गदर्शक आम्हाला सोडून गेला आहे, अशा भावना आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केल्या.
भाजपाची अपरिमित हानी
एकनाथराव खडसे म्हणाले की, प्रमोदजी महाजन, भाऊसाहेब, गोपीनाथजी मुंडे आणि मी असा एक ऋणानुबंधच या काळात जुळला होता. आमचे संबंध केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता पारिवारिक संबंध होते. आम्हा चौघांचेही एकमेकांच्या परिवारावर जिवापाड प्रेम होते. माझ्या जीवनात मानसिकरित्या व्यथीत होण्याचा दुःखद प्रसंग म्हणजे स्व.निखिलचे आम्हाला सोडून जाणे. त्यावेळी भाऊसाहेब केवळ सात्वंनासाठी न येता कोथळी येथील निवासस्थानी थांबूनच राहिले होते. भाऊसाहेब माझ्या प्रत्येक वाढदिवसाला स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा देत असत, भाऊसाहेबांनी आपले पुर्ण आयुष्य भाजपाच्या वाढीसाठी खर्ची घातले आणि आता सत्ता आल्या नंतर भाऊसाहेब असे अचानक निघून गेले त्यांच्या अचानक जाण्यामुळे महाराष्ट्र राज्य एका विकास पुरुषास मुकला आहे तसेच भाजपाची अपरिमित हानी झाल्याचे यावेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते.
यांची होती उपस्थिती
डॉ राजेंद्र फडके यांनी भाऊसाहेबांच्या आठवणीना उजाळा दिला. खासदार रक्षाताई खडसे, आ संजय सावकारे , जे डी सी सी बँक अध्यक्षा डॉ रोहिणीताई खडसे-खेवलकर, डॉ राजेंद्र फडके, महानंद अध्यक्षा मंदाताई खडसे, जि प उपाध्यक्ष नंदु महाजन, जि प माजी अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, सरचिटणीस सुनिल नेवे, दशरथ कांडेलकर, भागवत टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, मुक्ताईनगर प.सं.सभापती शुभांगीताई भोलाणे, रमेश ढोले विलास धायडे, राजु माळी, जि प सदस्य जयपाल बोदडे, वैशाली तायडे , विकास पाटील, योगेश कोलते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.