दिवंगत शरद राव यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

0
सर्व महापालिका कर्मचार्‍यांसह, राज्यभरातील कामगारांचे नेते
 माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार सोहळा
पिंपरी-चिंचवड : दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री  शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (1 सप्टेंबर) होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी यावेळी दिली. यावेळी मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, चारुशिला जोशी, दिगंबर चिंचवडे, अतुल आचार्य, नितीन समगीर, महाद्रंग वाघेरे, बंटी ठोकळ, उत्तम गंगावणे आदी उपस्थित होते.
पंचधातुचा अर्धाकृती पुतळा
झिंजुर्डे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ कडोलकर कॉलनी येथे शनिवारी दि. 1सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दिवंगत कामगार नेते यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, अध्यक्ष हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महाबळ शेट्टी, निमंत्रक . सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
18 लाख कामगारांचा नेता
शरद राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. एका गरीब कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवूनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती. चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते  सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.