दिवसागणीक चेहरे बदल; वृत्ती मात्र तिच!

0

आज विज्ञानयुगात आपण जगत आहोत. देशात कोट्यवधी स्त्रिया नुसत्या साक्षरच नाही तर, चांगल्या सुशिक्षित आहेत. असे म्हणतात की, महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणावर या-त्या देशाच्या प्रगतीचा दर्जा ठरतो. साक्षरतेमुळे चांगल्या, वाईट, व्यवहाराची जाण प्रत्येक स्त्रियांमध्ये असतेच. तरीही अंध भक्तीत अंधश्रध्दा, रुढी, परंपरा जपत चांगल्यात चांगला सुशिक्षित वर्गही अम्मा, टम्मा, बुवा बाजीच्या विळख्यात स्वतःला गुंतवुण घेत, अंधरुढी व परंपरा यांना वाढीस लागण्यास खतपाणी घालण्याचेचकार्य करीत असल्याचे दिवसेंदिवस घडणार्‍या घटनांमधुन बर्‍याच वेळेस समोर आलेले आहे. अंधश्रध्देची पाळेमुळे जनमाणसामध्ये किती घट्ट रोवली गेली आहेत की, बुध्दी गहाण ठेवून अघोरी कृत्याचे समर्थन होत आहे याची जाणीवही अंध भक्तीतून नाहीशी झालेली आहे. आणि याचे भयंकर रुप जेव्हा समाजासमोर येते तेव्हा भक्तीत लीन होणार्‍यांची मानसिकता ही डोके सुन्न करणारी ठरते. संत, महात्म्यांच्या चेहर्‍याआडुन अराजकता माजविणार्‍यांची बरीच उदाहरणे समोर आलेली आहेत गाजीपुरचा रामवृक्ष यादव, रामपाल, आसाराम असे बरेच चेहरे समाजासमोर उघडे पडले व दिवसागणीक पडतच आहेत. तरीही अंध भक्तांच्या डोळ्यावरील झापड निघायला तयार नाही. बाबा, बुवाच्या दरबारात जातांना भक्त दरवाजावर केवळ आपली चप्पल, बुटच बाहेर काढुन येत नाहीत तर, आपले मेंदुही चप्पल बुटांच्या बाजूला काढुन येतात. असेच म्हणावे लागेल.

अंधश्रध्दा निर्मुलन सध्या काळाची गरज आहे कारण आजकाल बुवाबाजी, जादुटोणा करणारे, सामान्यांना फसवूण लुबाडणार्‍या भोंदुंचे चेहरे दिवसागणीक समोर येतच आहे. त्यामुळे अनिष्ठ प्रथांच्या नावाखाली बुवाबाजीचा बाजार मांडुन सामान्यांच्या जीवाशी खेळ करणार्‍यांना वेळीच अटकाव होणे गरजेचे आहे. स्वामी, बाबा, मठपती धर्माच्या नावाने भोळ्या भाबड्या जनतेला चुकीच्या चालीरिती व अंधश्रध्देने धार्मिक कार्याच्या आडुन सामान्यांची दिशाभुल करुन फसवणूकीचा गोरखधंदा मांडून बसले आहेत. आस्थेच्या नावावर भक्तांची दिशाभुल करुन आपल्या अंध भक्तांच्या भक्तीच्या जोरावर समर्थनाचा एखाद्या ढालीसारखा उपयोग करुन बुवाबाजीचा बाजार मांडणारे किती शक्तीशाली बनले आहेत याची पुसटशी कल्पना होती परंतू डेरा सच्च्याच्या प्रकरणाने तर नवीनच आव्हान देशापुढे उभे केले आहे. अध्यात्म्याच्या चेहर्‍याआडुन अशी गुंडागर्दी माजवली की, टैल टपोरींना आवर घालण्यासाठी भारतीय सेनेला पाचारण करावे लागते. याला काय म्हणावे? आरोपीच्या समर्थनार्थ पेटलेल्या हिंसाचारात 30 लोकांचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनालाच मुकदर्शक बनवून सोडणे, व्यक्तीपुजेचे हे भयंकर स्वरुप देशासाठी हानीकारक ठरु शकते? आरोपीच्या समर्थनार्थ न्याय देवतेलाच दोषी ठरवून निर्णय बदलाचा सल्ला देण्याची हिंमतही अंध भक्त ठेवतात. ही कसली श्रध्दा? रामरहीमने बुवाबाजीचा बाजार अशा प्रकारे मांडला की, हतबल करुन टाकण्याचे कसबच त्याने आत्मसात केले. रामरहीम प्रकरणात संबंधीत प्रशासन परिस्थिती हाताळतांना सपशेच अपयशी ठरले असतांना स्वतःची पाठ जरी थोपटून घेतली असली तरी, भक्तांच्या उच्छादाने सर्वसामान्यांचा सरकारवर विश्‍वास उरलेला आहे असे वाटत नाही, त्याचा हिशेब भविष्यात चुकता होईलच यात शंकाच नाही. खंत मात्र एवढीच की, समाजात ‘देवा’च्या संकल्पनेवर आपले सर्वस्व अवलंबुन ठेवत मानसिक, शारिरीक, गुलामगिरीत स्वतःला गुरफटून टाकुन धन्यता माननारे कमी नाहीत म्हणूनच वर्षबदलाबरोबर फक्त चेहरे बदलतात वृत्ती मात्र तीच असल्याची प्रचीती येत आहे.

-सुषलर भालेराव
9860074600