दिवाळीच्या सुटीत गावी परतणार्‍या विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात ; पित्यासह चिमुरडी ठार

0

चौघे गंभीर ; छडवेल पखरूण गावाजवळील घटना ; भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने वाहन उलटले

साक्री- दिवाळीच्या सुटीनिमित्त गावाकडे परतणार्‍या विद्यार्थ्यांच्या महिंद्रा जीपला ा समोरून भरधाव आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने वाहन उलटून पिता-पूत्रीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सुरत-नागपुर महामार्गावरील छडवेल पखरूण गावाजवळ शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दीपाली संदीप गावीत (13, रा़ पिंजारझाडी) या चिमुकलीसह तिचा पिता तथा वाहन चालक संदीप ब्रिजलाल गावीत (चालक) यांचा जागीच मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी होते तर चौघा गंभीर जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य जखमींवर साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदिवासी विद्यार्थी घरी परतताना अपघात
दिवाळीच्या सुटीनिमित्त आदिवासी विद्यार्थी वाहनाने घरी जात असताना अपघात झाला. या अपघातात दिलबर एकनाथ चौरे (10, रा़ पाचमौली) हिरालाल ब्रह्मा चौरे (रा़ पाचमौली) राजेंद्र भगवान पवार (35, रा़ मावचीपाडा) हे गंभीर जखमी झाले तर करीना मनोहर कांबळे (13 रा़ रायतेल), दीक्षांत भरत गावीत (10, रा़ पिंजारझाडी) मृणाल कन्हैयालाल भोये, भारती भीमराव बागुल (13, रा़ गुलतारे) कन्हैयालाल तुळशीराम भोये (30, रा़ जामखेल), भरत आत्माराम गावीत (50, रा़ पिंजारझाडी) आदी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ़ भरत गोहील व डॉ़ भदाणे यांनी उपचार केले. यावेळेस या विद्यार्थ्यांच्या सोबत काही पालकही होते़ पालकांनी गावातीलच महिंद्रा जीप (एम.एच.18 डब्ल्यू 6653) भाडे तत्वावर करुन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेवर गेले होते़ तेथून परत येत असताना छडवेल पखरून जवळ समोरून येणार्‍या वाहनाने गाडीला हुलकावणी दिल्याने विद्यार्थ्यांचे वाहन पलटी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.