दिवाळीत फटाके फोडताना वायू प्रदुषण टाळा

0

अग्निशामक विभागाकडून नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

उंच जाणारे फटाके टाळा

पिंपरी चिंचवड : दरवर्षी दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यामुळे काही अनुचित घटना घडत असतात. यावर्षी तशाप्रकारच्या घटना घडू नये, याकरीता तसेच होणारे ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून नागरिकांना सूचना करत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी..

अग्निशमन दलाने केलेल्या आवाहनानुसार, शक्यतो फटाके फोडणे टाळावे, फोडायचेच असल्यास कमी आवाजाचे फटाके फोडावे. फटाके फोडताना सुती कपडे वापरावे. मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच बालकांनी फटाके वाजवावे. भुईनळे पेटविताना ते हातात न धरता जमिनीवर योग्य पद्धतीने ठेवूनच पेटवावे. फॅन्सी फटाक्याचे प्रकार त्यांच्या बॉक्सवरील सुचना वाचूनच वाजवावे. उंच जाणारे फटाके इमारतीजवळ न वाजवता मोकळ्या जागेतच वाजवावे फटाके फोडून झाल्यावर त्यावर पाणी टाकावे, कमी तीव्रतेचेच फटाके वाजवावे. बंदी असलेल्या क्षेत्रात फटाके फोडू नये. वाळूच्या बकेट आणि मुबलक पाणी जवळ ठेवूनच फटाके फोडावे.

पार्किंगच्या ठिकाणी फटाके वाजवू नये…

फटाके फोडताना नायलॉन कपडे घालणे टाळावे, फटाक्याच्या माळा किंवा फटाके हातात धरुन पेटवू नये, कपड्यांच्या खिशात फटाके ठेवू नये, रुग्णालय, शाळा, आजारी व्यक्तींच्या घराजवळे, पार्किंगच्या ठिकाणी फटाके वाजवू नये. मोठा आवाज करणारे किंवा काचेच्या भांड्यात फटाके फोडू नये. आकाशकंदील फटाक्यांचा वापर करु नये, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन दलाने केले आहे. तसेच काही घटना घडल्यास मदतीसाठी संपर्क क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत.

अग्निशामक केंद्राचे संपर्क क्रमांक  
पिंपरी केंद्र – 27423333
भोसरी केंद्र – 8669692101
प्राधिकरण – 27652066
रहाटणी – 8669693101
तळवडे – 27690101
चिखली – 27494849