दिवाळीत सुट्ट्यांमध्ये कुटुंबियांना भेटून नोकरीच्या ठिकाणी परततांना तरुणाचा मृत्यू

0

मध्यप्रदेशातील चाँदणी स्थानकावरील घटना ; मोबाईलमुळे नातेवाईकांशी झाला संपर्क

जळगाव : दिवाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबियांना भेटून उत्तरप्रदेशातून कामाच्या ठिकाणी गुजरातकडे परतत असताना धावत्या रेल्वेतून पडल्याने सुधीर गिरी हरिंदर गिरी (24) मुळ रा.अराजीमुत्तखीपूर ता. बालिया (उत्तरप्रदेश) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 06 नोव्हेंबर रोजी घडली होती. त्याच्याकडील मोबाईलच्या माध्यमातून नातेवाईकांशी संपर्क झाला. नातेवाईकांनी भुसावळ गाठले तेथून शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहून ओळख पटविली.

गुजरात राज्यातील कच्छ येथे होता कंपनीत
सुधीर गिरी हा तीन महिन्यापासून गुजरातमधील कच्छ भूज येथे एका कंपनीत कार्यरत होता. दरम्यान दिवाळी निमित्त सुधीर हा उत्तरप्रदेशातील कुटुंबियांकडे गेला होता. 05 नोव्हेंबर रोजी गुजरातला जाण्यासाठी सुधीर उत्तरप्रदेशातून रेल्वेने निघाला असता दुपारी 03.20 वाजता मध्यप्रदेशातील चांदणी जवळ खांबा नं. 515 येथे धावत्या रेल्वेतून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती भुसावळ स्टेशन मास्तर यांनी भुसावळ लोहमार्ग कळविली. त्यानंतर घटनास्थळावरून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयातीन शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला होता.

नातेवाईकांनी गाठले जिल्हा रुग्णालय
बुधवार दि. 06 नोव्हेंबर रोजी कुटुंबियांनी सुधीर याच्या मोबाईल फोन वर संपर्क साधला असता पोलिसांनी फोन उचलला. व झाल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. व ओळख पटविण्याच्या अनुषंगाने त्यांना भुसावळ येथे बोलविले. त्यानुसार सुधीरचे नातेवाईक आजोबा जयुमरद गिरी, जयनाथ गिरी, चुलत भाऊ अंकेश गिरी, मित्र सोनू राजभट, सोनू यादव, राजेश यादव यांनी 8 नोव्हेंबर रोजी भुसावळ व तेथून जिल्हा रुग्णालयात गाठले. याठिकाणी ओळख पटविली असता, मयत सुधीर गिरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शवविच्छेदन करुन नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून मूळ गावी रवाना झाले.

कुटुंबांची उदरनिर्वाहाची जबाबदारी होती तरुणावर
सुधीर गिरी हा कुटुंबातील कर्ता होता. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसलाय. मयताच्या पश्चात पत्नी रेशमा, मुले रोबीन (05), रोनी (03), भाऊ अमन (08) विवाहित बहिण प्रतिमा गिरी, अविवाहित लहान बहिण अनु गिरी आई प्रभावती, वडील असा परिवार आहे. आज शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.