दिवाळीत स्वस्त धान्य लाभार्थींना दिलासा : 35 रुपये किलोप्रमाणे मिळणार हरभरा अन् उडीद डाळ

0

भुसावळ- दिवाळीनिमित्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी 35 रुपये किलोप्रमाणे हरभरा व उडीद डाळ मिळणार असल्याने गोरगरीब लाभार्थींना दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे. भुसावळ तालुक्यासाठी 242 क्विंटल डाळींचे नियतन मंजूर झाले आहे. यात हरभरा डाळ 121 व उडीद डाळ 121 क्विंटल आहे. या योजनेने गरीब लाभार्थ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. यापूर्वी देखील भुसावळ तालुक्यासाठी 121 क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली होती. पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी 286 मेट्रिक टन हरभरा तर 143 मेट्रिक टन उडीद डाळ उपलब्ध झाली आहे. लवकर तालुकास्तरावर नियतन प्राप्त होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. दिवाळीपूर्वी प्रत्येक रेशन दुकानांमधून अनुदानित दराने डाळींचे वितरण केले जाणार आहे. पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. अंत्योदय व लाभार्थी कुटुंबीयांतील लाभार्थींना प्रति कुटूंब दोन किलो डाळींचे वितरण केले जाणार आहे.