दिवाळी अंक अनेकांना घडविणारी कार्यशाळा

0

पुणे । दिवाळी अंक ही साहित्यिकांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना घडविणारी कार्यशाळा आहे. या दिवाळी अंकातील साहित्यात रुक्षपणा येत असून त्यातून मानवी ओलाव्याचे लेखन आले पाहिजे. साक्षेपी संपादकांची पिढी हरवली आहे. त्याचबरोबर मराठी भाषा शिकण्याची आस संपत असून मुद्रितशोधनही मागे पडत आहे. अशा अनेक आव्हानांवर विचारविनिमय करण्यासाठी केवळ दिवाळी अंक या विषयावर दोन दिवस संमेलन होण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.लायन्स क्लब ऑफ पुणे औंध-पाषाणच्या वतीने आयोजित ‘दिवाळी अंक परिसंवाद-अपेक्षा आणि अपेक्षाभंग’ या विषयावर खान बोलत होते. डॉ. अनिल अवचट, ह. मो. मराठे, अरुण जाखडे, संजय भास्कर जोशी यामध्ये सहभागी झाले. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सतिश देसाई यावेळी उपस्थित होते.

सातत्य आणि सांस्कृतिक लोकशाही या जमेच्या बाजू
सबनीस म्हणाले, सातत्य आणि सांस्कृतिक लोकशाही या दिवाळी अंकांच्या परंपरेच्या जमेच्या बाजू आहेत, मात्र, केवळ रंजन आणि जाहिरातींसाठी दिवाळी अंक असावेत का, याचा विचार झाला पाहिजे. मराठे यांनी दिवाळी अंकांबद्दलची उत्सुकता कायम आहे. तरी दहा वर्षानंतर काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही अशी चिंता व्यक्त केली. डॉ. अवचट म्हणाले, पूर्वी संपादक आणि लेखकात दिवाळी अंकामुळे नाते निर्माण व्हायचे, तसे आताही झाले पाहिजे. जुन्या-नव्याचा संगम घडवून जाहिरातींची फिकीर न करणारे काही दर्जेदार अंक निर्माण झाले पाहिजेत आणि सुसंकृत समाजाने ते उचलून धरले पाहिजेत.जोशी म्हणाले, नामवंत दिवाळी अंकांनी ठरवून नवोदितांना संधी दिली पाहिजे आणि नव्या अंकांमध्येच नामवंतांनी लिहिले पाहिजे. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.