नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कायम कामगारांना दिवाळीसाठी 19 हजार रुपये व कंत्राटी कामगारांना 12 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीने मंजूर केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेमध्ये कायम कर्मचार्यांसाठी दोन हजार व कंत्राटीसाठी अडीच हजार रुपयांची विक्रमी वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कामगारांना 17 हजार रुपये व कंत्राटी कामगारांना 9500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे असे स्थायी समितीत सुचविण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आग्रह धरला.
रक्कम बँकेत जमा करा
कामगारांमध्ये पक्षपात करू नये. दिवाळी आनंदामध्ये साजरी करता आली पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. कामगारांना सानुग्रह अनुदान वाढवून द्या, अन्यथा विषय मतासाठी टाका अशी भूमिका मांडून सत्ताधार्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सानुग्रह अनुदानाची रक्कम कंत्राटी कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा करावी असे सुचविण्यात आले.